मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल अकरा महिन्यांनी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड जेलमध्या  न्यायलयीन कोठडीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत. 


अनिल देशमुखांविरोधात आरोप काय?
अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.


ईडीच्या आरोपांनुसार, सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.