महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह
गणरायासमोर आरत्या गाण्याची चढाओढ लागली आहे. ढोलताशे निनादत आहेत.
मुंबई : अवघ्या महाराष्ट्रात मांगल्य, आनंद आणि चैतन्य नांदतंय. 14 विद्यांचा आणि 64 कलांचा अधिपती गणरायाचं वाजत गाजत आगमन झालंय. घरोघरी बाप्पाच्या सरबराईचा उत्साह आहे. घरोघरी गणराय विराजमान झालेत. सार्वजनिक गणेश मंडळांचे गणरायही विराजमान झालेत.
घरोघरी आज मोदकांचं जेवण झाल्यामुळे मंडळी आनंदात आहेत. गणरायासमोर आरत्या गाण्याची चढाओढ लागली आहे. ढोलताशे निनादत आहेत.
पाहुणेमंडळी एकत्र आली आहेत. असं संपूर्ण राज्यात चैतन्यमय वातावरण पसरलं आहे. पावसानेही गणरायाच्या स्वागतासाठी संततधार ठेवल्यामुळे वातावरणात प्रसन्न गारवाही पसरलाय. या चैतन्यमयी राज्याचा अधिपती आहे केवळ एक तो म्हणजे गणराय.