मुंबई : भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षामुळं महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आणखीच वाढलाय... अगदी पंधरावा दिवस उलटला तरी अजून मुख्यमंत्रिपदाचा पाळणा काही हललेला नाही. गोड बातमी मिळेल, असं सांगून चक्क बनवाबनवी सुरूय की काय? अशी शंका येऊ लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लवकरच गोड बातमी मिळेल', असं मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं. भाजपचे नेते राज भवनावर जाणार असल्यानं गुरुवारी गोड बातमी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सरकार स्थापनेचा दावा न करताच, केवळ राज्यपालांशी कायदेशीर बाबींवर चर्चा करून भाजपचे नेते परतले. त्यामुळं गोड बातमी मिळाली नाहीच.


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ वा दिवस उजाडला तरी अजून सत्ता स्थापनेचा घोळ संपत नाहीय. भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष संपण्याऐवजी आणखीच वाढत चाललाय. शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा सूर उमटला.


शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर तिखट शब्दांत भाजपवर हल्ला चढवला. राऊत यांच्या भडीमारामुळं सत्तासंघर्ष आणखीच तीव्र झाला झालाय.



गोड बातमी मिळेल म्हणून आशेवर असणाऱ्यांचा पुरता विचका झालाय. गोड बातमी राहिली बाजूला, उलट पाळणा आणखी लांबल्यानं भाजप-शिवसेनेच्या संसारात आणि महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झालाय. सरकार बनवणं दूर, राजकीय पक्षांकडून जनतेची नुसतीच बनवाबनवी सुरू आहे.