सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर
यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता.
मुंबई: भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, आपले सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे.
यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता. तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन झाल्यानंतर २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ या काळात बाळासाहेब सावंत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती. हा कालावधी नऊ दिवसांचा होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवघ्या चार दिवसांत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची वेळ ओढावली आहे.
अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म यशस्वीपणे पूर्ण केली होती. काँग्रेसचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले होते. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्येही ते चमत्कार करून दाखवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, त्यांची ही खेळी सपशेल अपयशी ठरली.