जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; १४ हजार गावांत भूजल पातळीत एक मीटरने घट
राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांसाठी साडेसात हजार कोटी खर्च झालाय.
मुंबई: राज्य सरकारकडून जलयुक्त शिवार मोहिमेच्या यशाचे गोडवे गायले जात असतानाच राज्यातील १४ हजार गावांमधील विहिरीची पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा जास्तने घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जलयुक्त शिवार योजनेमुळे १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा सरकारने केला होता. मात्र, या अहवालामुळे हे सर्व दावे फोल ठरल्याचे स्पष्ट झालेय.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामांसाठी साडेसात हजार कोटी खर्च झालाय. त्यातून ५ लाख ४१ हजार कामं झालीत. तरीही राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यातील १३ हजार ९८४ गावातील भूजल पातळीत १ मीटरपेक्षा घट झाली असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल सांगतो. याचाच अर्थ जलयुक्तच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
यंदाच्या ऑक्टोबर महिन्यातील पाणी पातळीशी मागील पाच वर्षातील याच महिन्यातील पाणी पातळीशी तुलना करून समोर आलेली माहिती राज्यातील दुष्काळाची तीव्रता दर्शविते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीच्या सभेत महाराष्ट्रातील १६ हजार गावे जलयुक्त शिवारमुळे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा केला होता. त्या गावांची यादी जाहीर करण्याची मागणीही काँग्रेसने केली.