मुंबई: ठाकरे सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रेक्षकांना सवलतीच्या दरात हा चित्रपट पाहता येईल. तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहीमेवर आधारित असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकारांचा दमदार अभिनय आणि अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या साहसी दृश्यांमुळे 'तान्हाजी' चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. आतापर्यंत हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री कधी होणार, याची प्रतिक्षा सर्वांना होती. 


'तान्हाजी'तील ऐतिहासिक प्रसंगांविषयी सैफचा मोठा खुलासा


काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यात तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून सर्वांना या निर्णयाची प्रतिक्षा होती. अखेर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 



येत्या काळत 'तान्हाजी'ला कंगना रानौत स्टारर 'पंगा' आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'स्ट्रीट डान्सर ३डी'चं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे आव्हान पेलत पुढे या चित्रपटाची वाटचाल कशी असणार याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल. 


एकीकडे 'तान्हाजी' चित्रपट प्रचंड गाजत असला तरी अनेकांनी चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांमध्ये झालेल्या फेरफाराबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. या चित्रपटात उदयभान राठोड ही भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खान यानेदेखील या त्रुटींवर बोट ठेवले होते. हे खरं आहे की काही गोष्टी वास्तवाशी मिळत्याजुळत्या नाहीत. याबाबत मी फक्त एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. भविष्यात अशी कोणतीही भूमिका स्वीकारताना मी अधिक सतर्क राहीन, असे सैफने म्हटले होते.