मुंबई : कायमच काही आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याने त्याच्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'तान्हाजी' या चित्रपटाविषयी एक मोठी बाब सर्वांसमोर मांडली आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' tanhaji या चित्रपटातून ज्या पद्धतीने इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे, ही बाब चुकीची असल्याचं सैफने नुकतच एका मुलाखतीत स्पष्ट केलं.
'फिल्म कंपॅनियन'शी संवाद साधताना त्याने या आशयाचं वक्तव्य केलं. उदयभान राठो़ड हे पात्र आपल्याला भावल्यामुळेच आपण त्याचा स्वीकार केल्याचंही त्याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. चित्रपटातून मांडण्यात आलेला इतिहास हा काही अंशी चुकीचा असल्याची बाबही त्याने स्वीकारली. पण, व्यावसायिक चित्रपटाच्या यशासाठी या तंत्राचा अवलंब अनेकदा केला जात असल्याची बाब पुढे करत त्याने आपल्या वक्तव्यामध्ये समतोल साधला. मुख्य म्हणजे चित्रपटसृष्टीची ही भूमिका प्रशंसनीय नसली तरीही ती नाकारताही येत नाही, ही वास्तविकताही त्याने या मुलाखतीतून न विसरता मांडली.
'तान्हाजी'मध्ये दाखवण्यात आलेलं राजकारणसुद्धा अनेक प्रश्नांच्या विळख्यात आहे, यावर सैफला त्याचं मत विचारलं असता त्याने काही गोष्टी अधोरेखित केल्या. 'हे खरं आहे की काही गोष्टी वास्तवाशी मिळत्याजुळत्या नाहीत. या बाबत मी फक्त एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. अशा राजकीय रणनितीवर मी यापूर्वीही प्रश्न उपस्थित केले आहेत. किंबहुना अशा कथानकाविषयी मी यापुढे अधिक सतर्क असेन', असं म्हणत हा चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे या अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सैफने प्रकाश टाकला.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
एकिकडे आपण उदारमतवादाची चर्चा करतो आणि दुसरीकडे आपण लोकप्रितेच्या राजकारणाला आपलंसं करतो, असं सूचक विधान सैफने केलं. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या 'तान्हाजी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण, तरीही एक वर्ग असाही आहे ज्याच्याकडून या चित्रपटातून मांडण्यात आलेल्या काही ऐतिहासिक संदर्भांना विरोध केला जात आहे. त्यावर आता खुद्द सैफनेच प्रतिक्रिया दिल्यामुळे या विषयाला चालना मिळाली आहे.