सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीला डोळा मारतेय?
सत्तास्थापनेच्या तिढ्यात या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत
मुंबई : भाजप-शिवसेनेचा सत्तास्थापनेचा गोंधळ संपता संपताना दिसत नाही. त्यातच राऊतांच्या 'सिल्व्हर ओक'वर फेऱ्या वाढल्या आहेत. संजय राऊत एक दिवसाआड 'सिल्व्हर ओक'वर जाताना दिसत आहेत. भाजपा १०५ वर अडलेली असताना भाजपाचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही, हा सूर शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीत वाढत चाललाय.
सत्तास्थापनेच्या तिढ्यात या भेटीगाठी महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेबरोबर जाण्यास अद्यापही काँग्रेसची संमती नसली तरी शिवसेनेला सशर्त पाठिंबा देण्याबात काँग्रेस सकारात्मक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. केंद्रातील सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच काँग्रेस शिवसेनेशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सोमवारी दिल्लीत झालेल्या भेटीत सोनिया गांधींची पवारांसमोर ही भूमिका मांडल्यांचं कळतंय. त्यामुळे पवारांची सोनियांशी चर्चा सुरूच राहणार आहे.
तुमचं जमत असेल तर बघा, नाहीतर आम्ही आहोतच, हे पहिल्या दिवसांपासूनच पवारांचं ठरलंय. सेना आणि राष्ट्रवादीच्या बैठका आणि भेटीगाठीही वाढल्या आहेत. सध्या तरी सगळेच चेंडू शिवसेनेच्या मातोश्रीच्या कोर्टात गेलेत. बॅट उद्दव ठाकरेंच्या हातात आहे.