मेघा कुचिक / मुंबई : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari's Controversial Statement : महाराष्ट्रातून विशेषतः मुंबई-त्यांच्यातून गुजराती आणि राजस्थानी नागरिकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसेच रहाणार नाहीत. मग महाराष्ट्र आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही, असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रातून विशेषतः विरोधकांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.


राज्यपालांना मनसे स्टाईलने उत्तर देणार का ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी माणूस आणि मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षानेदेखील राज्यपालांवर कडाडून टीका केली आहे. महाराष्ट्राचा अपमान कदापि सहन करणार नाही. राज्यपालांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. हा राज्यपालांना इशारा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत मराठी माणसाचाच हात आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मनसे स्टाईलने राज्यपालांन प्रत्युत्तर देणार का, या प्रश्नावर आम्ही राज्यपाल म्हणून त्यांच्या पदाचा आदर करतो. ते स्वतः जरी त्यांच्या पदाचा सन्मान ठेवत नसले तरी आम्ही त्यांच्या पदाचा सन्मान ठेवतो. पण त्यांनी काहीही बोलू नये असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.


संदीप देशपांडे मनसेची भूमिका स्पष्ट करताना पुढे असेही म्हणाले की,  ज्यांना असं वाटतं की आर्थिक प्रगती हीच खरी प्रगती आहे ही त्यांची बौद्धिक दिवाळी आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जे नियोजन केले त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले. म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत राज्य ठरते. महाराष्ट्रामुळे इतरांची प्रगती झाली. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, राज्याचा इतिहास कळत नाही त्यावर राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये अशी मनसेची स्पष्ट भूमिका आहे.


पुरे आता ...यांनी आता घरी बसावं ... मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये. नावात भगतसिंह इतकेच यांच कर्तृत्व बाकी. वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा. संतापजनकआणि निषेध, असे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी टीका करताना म्हटले आहे.


प्रगत दृष्टी असलेला समाज, शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ, प्रबोधनाची मोठी परंपरा आणि व्यापार तसेच उद्योगस्नेही राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वातावरण असल्याशिवाय भांडवल येऊन संपत्तीची सतत निर्मिती होत राहत नाही. महाराष्ट्राच्या  राज्यपालांनी महाराष्ट्राचा हा इतिहास जाणला पाहिजे, असे ट्विट करत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.