Third Mumbai latest update : मुंबई शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत असून, या शहरातील पायाभूत सुविधा आणि येथील दळणवळणाच्या सुविधांवर वाढणारा ताण पाहता महाराष्ट्र राज्य शासनानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळानजीकच्या परिसरात एक नवं शहर उभारलं जाणार असून त्या शहराचं नाव असणार आहे, 'थर्ड मुंबई' अर्थात 'तिसरी मुंबई' (Third Mumbai).  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या माध्यमातून (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हे शहर मुख्य मुंबईशी जोडले जाणार असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलं आहे. सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिली. 


सुविधांच्या बाबतीत मुंबईलाही टाकणार मागे? 


मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वर या नव्या मुंबईच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नव्या मुंबईमध्ये उल्वे, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि आजुबाजूच्या परिसरातील 323 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश असेल. यामध्ये 'नैना' प्रकल्पातील गावांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या विकसित शहरामध्ये जितक्या सोईसुविधा असतात त्या सर्व सुविधा या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये असतील असं सांगण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Coronavirus नं चिंता वाढवली; केरळात एकाच दिवशी 111 रुग्ण आढळल्यानं खळबळ; केंद्र शासनाकडून निर्देश जारी 


निवासी संकुलं, व्यावसायिक संकुलं, डेटा सेंटर, मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॉलेज पार्क अशा सुविधा या शहरात असणार आहेत. याशिवाय सार्वजनिक प्रवासासाठी उत्तमोत्तम सुविधांरा भरणा इथं असणार आहे. प्राथमिक माहितीनुसार उरण, पनवेलमधील 23 गावांमध्ये सिडकोच्या  वतीनं 12 हजार कोटींचा खर्च करत रस्तेबांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. 


कसे असतील शहरातील अंतरंग? 


नव्या शहरामध्ये रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांचं जाळं तयार करण्यात येईल, ज्यासाठी या मार्गातील अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत. आश्चर्याची बाब म्हणदे येथील रस्ते बांधताना कुठंही सिग्नल यंत्रणा आणि चौक येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. ज्यामुळं रस्त्यांची एकंदर रचना सरळ रेषेत ठेवण्यात येणार असून, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास तयार केला जाणार आहे. त्यामुळं लवकरच या भागामध्ये सिग्नल यंत्रणा नसणारे रस्ते पाहता येणार आहेत. 


नव्या अर्थात तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमागे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लावणं हासुद्धा मुख्य हेतू असणार आहे. ज्याअंतर्गत खारघरमध्ये दुसरं बीकेसी प्रस्तावित आहे. या नव्या शहरातील सुविधा आणि भविष्यातील एकंदर संधी पाहता तुम्हीही आता तिथंच शिफ्ट होण्याचा विचार कराल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.