मोठी बातमी! 12वी निकालाची मूल्यमापन पद्धती जाहीर, शिक्षण विभागाने जारी केला जीआर
दहावी, अकरावी आणि बारावीतील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन होणार
दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बारावीच्या निकालासंदर्भात मूल्यपान करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षण विभागाने जीआर जारी केला आहे. मूल्यमापनासाठी सीबीएसईच्या धर्तीवर 30:30:40चा फॉर्म्यूला ठरवण्यात आलाय. दहावीच्या अभ्यासक्रामवर 30 टक्के, अकरावीच्या अभ्यासक्रमावर 30 टक्के आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर 40 टक्के ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार 31 जुलै च्या आधी बारावीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
असा असेल फॉर्म्युला
इयत्ता दहावी मधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण यावर आधारित 30 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तर अकरावी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांच्या आधारे 30 टक्के गुण दिले जातील. इयत्ता बारावी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परिक्षा, सराव परीक्षा सराव चाचण्या तसंच मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण 40 टक्के ग्राह्य धरले जाणार आहेत.
त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाकडून निकालासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यासह कमाल 7 सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत ?
दुसरीकडे दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील 96 टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत 100 टक्के शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता राज्य शिक्षण मंडळातील सूत्रांनी वर्तवली आहे.