मुंबई: काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक हे देशातील सर्वाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे राज्य ठरले होते. यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. गुंतवणुकीत कर्नाटक महाराष्ट्रापेक्षता सरस असल्याचा दावा त्यांनी सपशेल फेटाळून लावला. 


विरोधकांनी टीका करताना दिलेली आकडेवारी ही गेल्या ९ महिन्यांतील आहे. या काळात कर्नाटकने गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात बाजी मारली, हे खरे आहे. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. 


कर्नाटकमध्ये ९२ प्रकल्प आले, तर त्याच्या तिप्पट प्रकल्प २७५ आपल्या राज्यात आलेत. त्यामुळे महाराष्ट्र कुठेही कमी पडलेला नाही, असे देसाई यांनी सांगितले.  


'मेक इन इंडिया'च्या घोषणेनंतर राज्यात चार लाख कोटींचे गुंतवणूक प्रकल्प साकार झाले आहेत. तर 'मेक इन महाराष्ट्र'च्या माध्यमातून सहा लाख कोटींचे प्रकल्प राज्यात येतील, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.