कर्नाटकात सत्तांतर, महाराष्ट्रात काय? राज्यातील सिद्धरामय्या आणि शिवकुमार कोण?
कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसनं (Congress) सत्ता खेचून आणली कर्नाटकपाठोपाठ आता महाराष्ट्रातही सत्तांतर घडवण्याची स्वप्नं काँग्रेस नेत्यांना पडू लागलीत... मात्र हे स्वप्न पूर्ण करू शकेल, एवढ्या ताकदीचा नेता महाराष्ट्रात काँग्रेसकडे आहे का?
Maharashtra Politics : कर्नाटकातल्या (Karnataka) विजयानं महाराष्ट्रातल्या काँग्रेस (Maharashtra Congress) नेत्यांनाही स्फूरण चढलंय.. जे कर्नाटकात घडलं, तेच महाराष्ट्रात घडवू असा आत्मविश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतोय.. मात्र काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकेल, असा नेता महाराष्ट्रात आहे का? याची चर्चा आता सुरू झालीय. कर्नाटकच्या विजयात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivkumar) यांचा सिंहाचा वाटा आहे... प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जोर लावला. मात्र सिद्धरामय्या आणि शिवकुमार हेच काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आता महाराष्ट्रात काँग्रेसचा सिद्धरामय्या कोण? आणि शिवकुमार कोण? असा सवाल केला जातोय...
महाराष्ट्रात सिद्धरामय्या कोण? शिवकुमार कोण?
नाना पटोले (Nana Patole) हे विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांचं नेतृत्व सर्मसमावेशक नसल्याची टीका होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे असे तीन माजी मुख्यमंत्री काँग्रेसकडे आहेत. मात्र यातला एकही नेता भाजपला शिंगावर घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. बाळासाहेब थोरातांचं नेतृत्व सर्वसमावेशक असलं तरी आक्रमक नाही विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित देशमुख, सतेज पाटील, वर्षा गायकवाड अशा दुस-या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये क्षमता आहेत. मात्र त्यांना संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळं महाराष्ट्र जिंकून देण्याची क्षमता असणारा राज्यव्यापी नेता कोण, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांनाच पडलाय.
महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षं वगळली तर गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे. त्यात काँग्रेस नेत्यांमध्ये गटातटाचं राजकारण संपता संपत नाहीय. त्यामुळं सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासारखे एकदिलानं विजयी घोडदौड करणारे नेतेच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाहीत. महाराष्ट्राला आणि काँग्रेसला शाप आहे तो भाऊबंदकीचा. म्हणूनच कर्नाटकातला काँग्रेसचा विजय महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी आरसा दाखवणारा ठरतोय.
कर्नाटकात मुख्यमंत्री कोण?
कर्नाटकात काँग्रेसने भाजपाचा पराभव करत एकहाती सत्ता मिळवली. आता काँग्रेससमोर प्रश्न आहे तो मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करायची. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार या दोन नावांची चर्चा आहे. यातही कर्नाटकचे दिग्गज नेते सिद्धरामय्या आघाडीवर आहेत. राजकीय कारकिर्दीत सिद्धरामय्या यांनी 8 वेळा विधानसभा निवडणुक जिंकली आहे. तर 2013 मध्ये ते मुख्यमंत्री होते.
डी के शिवकुमार हे कनकपुरा विधानसभेतून मैदानात उतरले होते. त्यांनी भाजपते ज्येष्ठ नेते आर अशोक यांचा पराभव केला. त्याआधी ते 2008, 2013 आणि 2018 ची विधानसभा निवडणुक जिंकले आहेत. शिवकुमार हे उच्च शिक्षित आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.