`दादा म्हणतील तसं...` अजितदादा विरुद्ध गौतमी पाटील कलगीतुरा
अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसवल्यानंतर गौतमी पाटीलनेही पत्करली शरणागती
Gautami Patil : सबसे कातिल, लावणीस्टार गौतमी पाटील... तिच्या नखरेल आणि मादक अदांवप गावागावातली पोरंटोरं घायाळ होत नसतील तरच नवल. लाखो रुपयांची बिदागी घेणाऱ्या गौतमी पाटीलचा (Gutami Patil) लावणीचा कार्यक्रम म्हणजे अक्षरशः धांगडधिंगा. मात्र गौतमी पाटील लावणीच्या (Lavani) नावाखाली अश्लील नाच करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बैठकीत लावणीफेम अभिनेत्री मेधा घाडगे यांनी याबाबत तक्रार केली. तेव्हा यापुढं असे अश्लील कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिली.
अजित पवारांनी दिली तंबी
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनी अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. याची दखल घेत अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालावी. तसंच राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या.
गौतमी पाटीलची शरणागती
आता दादांनीच खडसावल्यानंतर गौतमी पाटीलनं सपशेल शरणागती पत्करलीय. दादांना मी काही बोलू शकत नाही, दादा म्हणतील तसं असं गौतमी पाटीलने म्हटलंय. पण अश्लील डान्स केल्याचा आरोप मात्र गौतमी पाटीलनं फेटाळलाय. उलट काहीही चूक नसताना तिला टार्गेट केलं जात असल्याचा आक्षेप तिनं घेतलाय.. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटल आहे.
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स होतोय, हे सत्य नाकारता येणार नाही.. लावणी डान्सर अश्लील इशारे, हातवारे करतात, हे तर उघड आहे. पण त्यासाठी केवळ एकाच लावणीस्टारला दोष देता येणार नाही, हे देखील तितकंच खरं... गौतमीची लोकप्रियता वाढल्यानं व्यावसायिक स्पर्धेतून तिला टार्गेट तर केलं जात नाही ना, याचीही शहानिशा व्हायला हवी...