पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ होऊन हा आकडा १८० पर्यंत जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा हा प्रयत्न भ्रम असेल, असे राऊत म्हणालेत. राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही.
विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
दरम्यान, विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असा टोला राऊत यांनी ट्वीटरवरुन मारला आहे. सरकार मजबूत आहे चिंता नसावी, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मातोश्रीवर चर्चा झाल्याची कबुली संजय राऊत यांनी दिली.
भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा शिक्का मारून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती महाविकास आघाडी सरकारला वाटतेय. त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका वाढल्या असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राजभवनवरील फेर्याही वाढल्या आहेत.
उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक
काल दुपारी शरद पवार राज्यपालांना भेटले, राज्यपालांनीच त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं. तर त्यानंतर सायंकाळी भाजपचे खासदार नारायण राणे राज्यपालांना भेटले आणि त्यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यापूर्वी दोन दिवस आधी संजय राऊतही राज्यपालांना भेटून आले होते. त्याआधी भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारच्या अपयशावर आरोप केले होते. तर भाजपचे नेते राजभवनवर जाऊन महाविकास आघाडी सरकारची तक्रारही करून आले होते.