Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तोडगा अगदी अंतिम टप्प्यात आलाय. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील शिंदे सरकार (Shinde Government) लवकरच मोठा निर्णय घेणाराय. नागपूरला होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Wintor Assembly Session) याबाबतचा ऐतिहासिक ठराव मांडला जाणार आहे.  बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाचा 'बिहार पॅटर्न' 
बिहारमध्ये सध्या अनुसूचित जातीसाठी - 20 %, अनुसूचित जमातीसाठी - 2 %, मागास वर्गासाठी - 18 %, अत्यंत मागास वर्गासाठी - 25 % आणि आर्थिक मागास वर्गासाठी - 10 % असं एकूण 75 % आरक्षण देण्यात आलंय. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर असाच फॉर्म्युला महाराष्ट्रातही राबवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेतली. काळानुरूप मागासलेपणाचे निकष बदलले तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, असं संभाजीराजेंनी भेटीनंतर सांगितलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्रात घमासान सुरूय. बिहार पॅटर्न (Bihar Pattern) राबवला तर मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही वर्गांचं समाधान होऊ शकतं. बिहारनं आधी जातनिहाय जनगणना केली आणि नंतर आरक्षण 75 टक्क्यांपर्यंत वाढवलं... आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना होणार? की केवळ राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरक्षण मर्यादा वाढवणार? याकडं सगळ्यांचं लक्ष असणाराय.


मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा
दरम्यान, मनोज जरांगेंच्या चौथ्या टप्प्याच्या दौऱ्याची सुरुवात जालनातल्या सभेपासून होणार आहे.. 1 डिसेंबरला होणाऱ्या या सभेसाठी जंगी तयारी सुरु आहे. 60 एकरवर ही सभा आयोजीत करण्यात आली असून गर्दीचा रेकॉर्ड मोडेल असा दावा आयोजकांनी केलाय.. सभेआधी जरांगेंवर 140 जेसीबीमधून फुलांची उधळण केली जाणार आहे. तसंच 101 तोफांची आतषबाजी करण्यात येईल. जालना शहर ते सभास्थळापर्यंत 10 हजार दुचाकींद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


100 एकरवर तर गाड्यांसाठी पार्किंगची सोय करण्यात आलीय. जालनातल्या या सभेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल केला जातोय. जरांगेंच्या सभेच्या बॅनरवर आता सर्व महापुरुषांचे फोटो असतील. जालन्याच्या सभेतून धार्मिक आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.. याआधी बॅनरवर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांचेच फोटो असायचे.