Maharashtra NCP Crisis: राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) भाजपाच्या (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. मुंबईत विधानभवनात (Vidhanbhavan) आज राष्ट्रवादीच्या एक दोन नाही तर तब्बल सहा आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या विधानभवनातल्या दालनात ही भेट झाली. यात धनंजय मुंडे, नितीन पवार, अण्णा बनसोडे, शेखर निकम, धर्मरावबाबा आत्राम हे आमदार अजित पवारांच्या दालनात होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनीही या आमदारांसोबत अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीत कोणती खलबतं झाली हे अजुन गुलदस्त्यात आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे कालच मुंबईत
अजित पवार समर्थक समजलेले जाणारे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) कालच मुंबईकडे रवाना झाल्याची बातमी सर्वात आधी झी २४ तासने दिली होती.. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. विधानभवनात अजित पवारांच्या दालनात धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये चर्चाही झाली.  विधानभवनातून बाहेर पडताना धनंजय मुंडेंनी हात जोडून बोलणंही टाळलं. परफेक्टली वेल असं म्हणत धनंजय मुंडे विधानभवनात निघून गेले. त्याआधी धनंजय मुंडे मंत्रालयात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात दिसले होते.


अजित पवारांसोबत 40 आमदार
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार असल्याचं समजतंय.. तसंच या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्रही अजित पवारांच्या गटाकडे असल्याचं कळतंय. जेव्हा वेळ पडेल तेव्हा या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना देणार असल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या सुधीर सूर्यवंशी यांनी दिलं आहे.


न्यू इंडियन एक्स्प्रेसचं वृत्त काय? 
अजित पवार निकालाआधीच सरकारला पाठिंबा देतील. सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात गेल्यासही फरक पडणार नाही. अजित पवारांच्या पाठिंब्यामुळे सरकार कोसळणार नाही. शरद पवारांना मानणाऱ्या आमदारांचाही अजित पवारांना पाठिंबा आहे, असं या बातमीत सांगितलं आहे. 


आमदार देवेंद्र भुयारही मुंबईत
अजित पवार यांचे कट्टर समर्थक असणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार मुंबईला रवाना झालेत. अनिल देशमुख आणि ते एकाच विमानात होते असंही समजतंय. देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहेत. तत्कालीन कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव करत ते आमदार झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्षही होते. राजू शेट्टींसोबत झालेल्या वादानंतर त्यांची स्वाभिमानीमधून हकालपट्टी झाली होती. शेती प्रश्नांवर आवाज उठवणारे भुयार अजित पवारांचे समर्थक आहेत..


शिंदे गट काय भूमिका घेणार?
अजित पवारांचा गट सत्तेत आल्यास आपण सत्तेत राहणार नाही असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. अजित पवार राष्ट्रवादी सोडून आल्यास त्यांचं स्वागतच आहे. मात्र अजित पवार सोबत आल्यास सत्तेत राहणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.