`मला राहू द्या ना घरी` पोलिसांचं जनतेला आवाहन
पोलिसांनी अनोख्या पद्धतीने जनतेला घरात बसण्यासाठी आवाहन केले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा फैलाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतांचा आकडा मोठा आहे. या माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विशेष करून डॉक्टर, नर्स आणि पोलीस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पण अजूनही जनतेमध्ये हवं तेवढं गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी अनोख्या पद्धतीने ट्विट करत लोकांना घरात थांबून करोनाला हरवण्याचा संदेश दिला आहे.
जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी 'नटरंग' चित्रपटातील 'मला जावू द्या ना घरी' या लोकप्रिय गाण्याची मदत घेत 'मला राहू द्या ना घरी' असं म्हटलं आहे. यासाठी त्यांनी अभिनेत्री अमृती खानविलकरच्या एका फोटोचा वापर केला आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोरोना सारख्या गंभीर आजाराला रोखण्याकरीता लोकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन सतत करण्यात येत आहे. तरी देखील नागरिक शिल्लक कारणांमुळे घरा बाहेर पडत आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं असलं तरी अत्यावश्यक सेवा चालू आहेत. कोरोनाचा हा वाढता प्रकोप पाहता लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं देखील राज्य सरकारने सांगितले आहे.
त्यामुळे वेळेत सतर्क व्हा, स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या असं वारंवार सांगण्यात येत आहे. शिवाय सोशल डिस्टंसिंग देखील ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं आहे.