Maharashtra Police Bharti 2024 : राज्यातून  पोलीस भरतीला मिळणारा प्रतिसाद आणि कोरोना काळात पोलीस दलामध्ये भरती न झाल्या कारणानं लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं संख्याबळ कमी पडत असल्यामुळं राज्यात पुन्हा एकदा पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 35 हजार रिक्त पदांवर पोलीस भरती झाल्यानंतर येत्या काळात पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात भरती होणार आहे. जवळपास 7500 पदांवर ही भरती होणार असून, यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी राज्यात मागील दोन वर्षांमध्ये अनुक्रमे 18 आणि 17 हजार पदांवर भरती करण्यात आली होती. पण, अद्यापही पोलिसांचं संख्याबळ कमी असल्या कारणानं या वर्षअखेरीस पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


डिसेंबर महिन्यातील पोलीस भरती प्रक्रियेआधी राज्यातील 14,471 पोलीस पदांवरील भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश गृह विभागाच्या वतीनं देण्यात आले आहेत. यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये चालक शिपाई, 5 जिल्ह्यांमध्ये बँड्समॅन आणि 25 जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई अशा पदांवर भरती प्रक्रिया राबवत त्याअंतर्गत लेखी परीक्षा घेण्यात आली. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या वतीनं देण्यात आले आहेत. 


हेसुद्धा वाचा : Monkeypox Virus:  मंकीपॉक्सनं वाढवली चिंता; भारतातही नवे नियम लागू, कोरोनाचेच दिवस परततायत? 


 


पावसाच्या दिवसांमध्ये मैदानांच्या अनुपलब्धतेमुळे भरती प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाल्याची बाब समोर आली. आता मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच नव्या भरती प्रक्रियेची सुरुवात केली जाणार आहे. येत्या काळात राज्यात पोलीस प्रशिक्षण केंद्राचीं क्षमता वाढवत सध्याचा 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रांचा आकडा दुपटीनं वाढवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय दिसत आहे. तेव्हा आता येत्या काळात पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील आणखी कोणती महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.