`खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो`; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.
Maharshtra Politics : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात पुन्हा इनकमिंग सुरु झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने, मनसे पदाधिकारी निलेश जंगम, उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांच्यासह शेकडो सहकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
"शिवसेनेसारखं प्रेम दुसऱ्या पक्षात मिळत नाही. हेच आपल्या शिवसेनेचे वैशिष्ट आहे. म्हणून तुम्ही आज परत घरात आल्यासारखं वाटतंय असे बोललात. हेच आपल्या शिवसैनिकांचे वैशिष्ट्य आहे. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचा एक डायलॉग आहे. आज मेरे पास ये है, आज मेरे पास वो है… तुम्हारे पास क्या है? तर आपल्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम आणि जिद्द आहे. सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण आपुलकी, माया, प्रेम, जिद्द, हिंमत ही कुठेही विकली जाऊ शकत नाही आणि विकत घेता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आपल्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम आणि जिद्द आहे. बाकीच्या गोष्टी पैशांनी विकत घेता येतात. आपुलकी, माया, हिंमत, प्रेम विकत घेता येत नाही. तुम्ही परत आपल्या घरात आलेला आहात. लढाई मोठी आहे. पण तुम्ही एकटवलात तर लढाई सोपी आहे. न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. खोके देणारे, खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीय, उद्धव ठाकरेंसोबत अख्खा महाराष्ट्र आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे दिवसभर कल्याण लोकसभा मतदारसंघात
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 13 जानेवारी रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार असल्याचे जाहीर केले. इथे दिवसभर ते ठाकरे गटाच्या शाखांना भेटी देणार आहेत. विधानसभेप्रमाणे शाखाभेट घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.