Shiv Sena : मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच
शिवसेनेतला (Shiv Sena) ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde Group) संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय.
मुंबई : शिवसेनेतला (Shiv Sena) ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट (Eknath Shinde Group) संघर्ष दिवसागणिक वाढतच चाललाय. शिवसेनेतल्या या वादामुळं विधान परिषदेत वेगळीच अडचण समोर आलीय. नेमकं काय घडलंय, पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra political crisis cm and mlc lop boaths are shiv sena party)
मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षनेता विरोधी पक्षाचा असं राजकीय समीकरण असतं. पण महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत भलताच राजकीय पेच निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील शिवसेनेचेच असा अभूतपूर्व घोळ सध्या विधानपरिषदेत पाहायला मिळतोय.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष रंगलाय. खरी शिवसेना कुणाची, यावरून दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू झालीय.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचं संख्याबळ विधानपरिषदेत जास्त असल्यानं अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेता करण्यात आलं. पण आता सत्ताधारी बाकावर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि विरोधी बाकावर शिवसेनेचेच दानवे असं चित्र पाहायला मिळणाराय.
दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेचे सभागृह नेते बनलेत. त्यामुळं आता विधानपरिषदेचं सभागृह नेतेपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडं आलंय.. मात्र त्यावर शिवसेना ठाकरे गटानं चांगलंच तोंडसुख घेतलंय.
विधानसभेत भाजप आणि शिंदे गटाचं स्पष्ट बहुमत आहे. मात्र विधानपरिषदेत शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त असल्यानंच देवेंद्र फडणवीसांनी सभागृह नेतेपद स्वतःकडे घेतल्याची चर्चा आहे. यानिमित्तानं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध फडणवीस असा सामना विधान परिषदेत रंगणाराय.