रुग्णालयातून बाहेर पडताच राज्यपालांचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना...
राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला दर दिवशी नाट्यमय वळण मिळत असतानाच राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळं ज्या दिवशी एकनाथ शिंदे नव्या गटाच्या पत्रासह त्यांच्याकडे जाणार होते, त्याच दिवसाची आखणी बिघडली.
राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्यामुळं या सत्तासंघर्षाच्या घडामोडी काहीशा मंदावल्या. पण, आता मात्र ते परतले आणि पुन्हा एकदा या प्रकरणाला वेग आला. (Maharashtra Political Crisis eknath shinde shivsena Governer bhagat singh koshyari big decision)
खुद्द राज्यपालांनीच आजारपणातून सावरल्यानंतर सर्वात मोठं पाऊल उचललं. सत्तेतून बंडखोरी केलेल्या जवळपास 48 आमदारांना आणि त्यांच्या कुटुंबांना पुरेशी सुरक्षा देण्यात यावी, यासंदर्भातील पत्र भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलं.
राजकीय रणधुमाळीच्या या वातावरणात काही नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्य पाहता बंडखोरी करणारे आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी पत्रात महत्त्वाचा मुद्दा मांडला.
दरम्यान, हा वाद आता सुरक्षिततेपर्यंत पोहोचल्यामुळं केंद्रानंही शिंदे गटातील 16 आमदारांच्या घरी केंद्राकजून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजप- एकनाथ शिंदे गटासोबत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.