नवाब मलिकांवरून महायुतीत महाभारत? फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवारांची कोंडी
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपनं जोरदार विरोध केलाय. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बमुळं महायुतीत खळबळ उडालीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्याला पाठिंबा दिलाय. पण यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली आहे.
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरून महायुतीत शीतयुद्ध पेटलंय. देशद्रोहाचे आरोप असलेल्या मलिकांना महायुतीत सामावून घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) ठाम विरोध केलाय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलेल्या लेटर बॉम्बमुळं राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात खळबळ उडालीय. यासंदर्भात मलिकांशी चर्चा केल्यानंतर पत्रावर काय करायचं ते मी करेन, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केली आहे. नवाब मलिकांनी शुक्रवारी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. मलिकांशी राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचा दावा यावेळी पटेलांनी केला.
दुसरीकडं प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मी माझी भूमिका मांडलीय, तुम्ही पुढे काय करायचं ते ठरवा असं फडणवीसांनी सांगितल्याचं समजतंय. नवाब मलिकांबाबत फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेला भाजपनेही समर्थन दिलंय.. मलिकांबाबत फडणवीसांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचं भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय.
फडणवीसांचा लेटर बॉम्ब?
जावई समीर खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यामागे भाजप असल्याचा नवाब मलिकांचा आरोप होता. त्यानंतर देवेंद्र आणि अमृता फडणवीसांच्या विरोधात त्यांनी वैयक्तिक आरोप केले. तर गोवावाला कंपाऊंड प्रकरण उघड करून मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. माफिया डॉन दाऊदची बहिण हसिना पारकरकडून मलिकांनी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना अटक केली
महत्त्वाचं म्हणजे नवाब मलिक वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही फडणवीसांच्या सूरात सूर मिसळल्याचं समजतंय. मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करूनच फडणवीसांनी हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दौऱ्यावर होते. त्याचवेळी या दोन्ही नेत्यांमध्ये नवाब मलिक यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलींय. यावेळी चर्चेत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना पत्र लिहावं असा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुर्ण पाठिंबा असल्याचीही वरिष्ठ सूत्रांनी माहीती दिलीय.
अजित गटाकडून स्पष्टीकरण
नवाब मलिकांकडून आम्ही कुठलंही ऍफिडेव्हिट घेतललं नाही, त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यात येऊ नये यासाठी फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिल्यानंतर नवाब मलिकांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांशीही चर्चा केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधा-यांच्या बाकावर दिसल्यानं विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण दिलंय.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं मलिकांच्या आडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच कोंडी केलीय. त्यामुळे महायुतीत अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र सध्या दिसतंय. मलिक प्रकरणात नेमकी काय भूमिका घ्यावी, अशा कात्रीत राष्ट्रवादी अजित पवार गट अडकलाय. हा वाद आता काय वळण घेतो, याची उत्सूकता सगळ्यांना आहे.