Ashok Chavan to join BJP : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माझी पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे. पहिलाच दिवस असल्याने असं झालं. कालच राजीनामा दिल्याने स्विचओव्हर झालं. सर्वात आधी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की, आमचे एकमेकांविषयी असलेले संबंध आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. गेल्या 38 वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे. पंतप्रधान मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे. देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज प्रवेश करत आहे," असे अशोक चव्हाण म्हणाले. 


"राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सकारात्मक दृष्टीकोन घेऊनच मी पुढे आलो आहे. विरोधी पक्षात असून सुद्धा जिल्ह्याला न्याय देताना देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेतली. जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. मी ग्वाही देऊ इच्छितो की तिच भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम करेन. आगामी निवडणुकीत राज्यात जास्तीत जास्त जागेवर यश मिळेल. राजकारण हे एक सेवेचे माध्यम आहे. पक्ष सोडल्यानंतर काही सहकारी टीका करतात. पण मी कोणावर दोषारोप करणार नाही. पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन या देशामध्ये काम केलं आहे. आम्ही विरोधात असताना कधीही व्यक्तीगत स्वरुपाचे दोषारोप कोणावर केले नाहीत. आमच्या काळात जे काम झालं त्याचे कौतुक देवेंद्र फडणवीसांनी केलं. आम्हीसुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक केले," असेही अशोक चव्हाण म्हणाले.


अशोक चव्हाण यांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला - देवेंद्र फडणवीस


"देशभरात पंतप्रधान मोदी यांनी ज्याप्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरु केलं आहे आणि जे परिवर्तन भारतात दिसायला लागलं त्यामुळे देशातील अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्यप्रवाहात काम करावं, मोदींसारख्या एका मजबूत नेतृत्वात काम करावं, मोदींचा देशाला पुढे नेण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांमध्ये आपणही वाटा उचलावा असे विचार अनेक नेत्यांमध्ये आलेत. यातलं एकप्रमुख नाव म्हणजे अशोक चव्हाण आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केलाय. त्यांनी केवळ इतकंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेत योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी पदाची कोणतीही अपेक्षा नाही, लालसा नाही.  अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रीपदं ज्यांनी भूषवली. आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्दी आपल्याला पाहिला मिळाली असे ज्येष्ट नेते अशोक चव्हाण, आाज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.