Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच ठाकरे गटाला धक्का बसलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर ईडीनं (ED) छापा टाकलाय. वायकरांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. वायकरांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somiaya) आरोप केला होता. जोगेश्वरीमधील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधलंय. त्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायकरांच्या घरी ईडी छापेमारी का पडली? 
जोगेश्वरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता वायकरांच्या घरी ईडीचे 12 अधिकारी पोहोचले. मातोश्री स्पोर्ट्स क्लब, सुप्रीमो बँक्विटच्या नावाने घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसंच बीएमसीच्या जागेवर फाईव्हस्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फाईव्हस्टार हॉटेलची किंमत 500 कोटींची असल्याचा आरोपही आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील जागेवर बांधकाम केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. रवींद्र वायकरांच्या एकूण 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. 


उद्धव ठाकरेंची टीका
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांवर ईडीने टाकलेल्या धाडींवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय.. जुलूमशाहांचा नि:पात जनताच करेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तर जोपर्यंत दिल्लीचं सरकार बदलत नाही तोपर्यंत धाडी सुरुच राहणार असं विधान शरद पवारांनी केलंय.


मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
कर नाही तर डर कशाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वायकरांवरच्या धाडीवर दिलीय.. ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात नाही.. उलट कोविडमध्ये पैसे खाणा-यांना कफनचोर किंवा खिचडी चोर म्हणायचं का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय.


कोण आहेत रवींद्र वायकर?
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे खास मर्जीतले नेते आहेत. शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. 1992 मध्ये वायकर पहिल्यांदा जोगेश्वरी मतदारसंघातून मुंबई महापालिकेवर निवडून आले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2014 असे सलग तीन वेळा सलग निवडून ले. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी तीनवेळा कार्यभार सांभाळला. तब्बल वीस वर्ष वायकर हे नगरसेवक होते. मुंबई महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 


2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात वायकर गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकर यांचं सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबनेटपदी बढती मिळेल अशी शक्यता होती. पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे तेन नाराज असल्याचं बोललं जात होतं.