Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन आता राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल अमरावतीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जहरी टीका केली होती. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. या वक्तव्यावरुन आता भाजप आक्रमक झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंवर टीका
महाराष्ट्राचा कलंकित करंटा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र भूषण असा फडणवीसांचा उल्लेख करून बावनकुळेंनी 13 कोटी जनतेच्या मनात फडणवीसांविषयी आदराचं स्थान असल्याचं म्हटलंय. उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी बावणकुळे यांनी केली. महाराष्ट्राला पूर्वी काळात अंधारात ठेवण्याचे काम कलंकित माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे .देशात मेट्रोचं नेटवर्क हे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना उभारले, नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणीस आहे. मात्र कमिशन मिळत नाही म्हणून मेट्रोचे प्रोजेक्ट बंद पाडणारे कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केलीय. 


विकृत मानसिकतेतून वक्तव्य
तर उद्धव ठाकरे यांनी नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात विकृत मानसिकतेतून वक्त्यव्य केलं त्यांनी 5 वर्षे महाराष्ट्राला विकासाभिमुख म्हणून ओळख करून दिली अश्या नेतृवाला त्यांच्या शहरात जाऊन विकृत वक्तव्य केलं. ते वैफल्यग्रस्त होऊन बोलत आहे. आतापर्यंत तुमच्यावर बोललो नव्हतो पण ते ठाकरे घराण्याला लागलेले कलंक आहे, महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे मराठी माणसाला सुद्धा कलंक आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 


नारायण राणेही संतापले
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर आसूड ओढले आहेत. नारायण राणे यांनी एक ट्विट केलं आहे, यात त्यांनी म्हटलंय 'सत्ताही गेली, पक्षही संपला नया निराशेपोटी नागपूरच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे निराशेपोटी व बौद्धीक पातळी खालवल्यानेच केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग व द्वेषापोटी केलेली ही टीका आहे. उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती सध्या चांगली नाही... त्यांना कधीही बौद्धिक व विधायक बोलता येत नाही. म्हणूनच शिव्या देणे व खालच्या पातळीवर येऊन नको ती टीका करणे हेच त्यांचे सध्या काम उरले आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही पक्षाच्या पुढारी अशाप्रकारचे खालच्या दर्जाचे वक्तव्य कधीच करत नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवणारा उद्धव ठाकरे हाच महाराष्ट्राला लागलेला खरा कलंक आहे. 


भाजप कार्यकर्ते आक्रमक
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून भाजपकडून नागपुरात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात भाजपाकडून निषेध सभा आयोजित करण्यात आलीय. झाशीची राणी चौकापासून व्हरायटी चौकापर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाने प्रतिकात्मक अंतयात्रा काढून उद्धव ठाकरेंचा निषेध केला. उद्धव ठाकरेंचा प्रतिकात्मक पुतळाही पेटवण्यात आलाय.