अशक्य ते शक्य करतील दादा..! `लाडकी बहीण योजने`साठी अजितदादांचा पुढाकार
Ladki Bahin Yojana : राज्यात `लाडकी बहीण योजने`वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसा लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेला वाद वाढतच चाललाय. राज्यातील दीड कोटी पात्र लाडक्या बहिणींना येत्या 19 ऑगस्टला प्रत्येकी 3 हजार रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार असल्याचं समजतंय. आगामी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना आखलीय. मात्र ही योजना टिकणं शक्य नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतलाय. लाडकी बहिण (Ladki Bahin Yojana) सारख्या योजनांमधून लाच देऊन मतं विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमानाने जगणारा आहे, भीकेवरती जगणारा नाही. महाराष्ट्राला पाहिजे ते हक्काचं पाहिजे, अनेक घरात तरुण बेरोजगार आहेत, आणि त्या घरात त्यांच्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन काय सरकारला काय साध्य करायचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
तर निवडणुकीच्या दोन महिने आधी नंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यानांच घ्यावी लागणार आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना आलेला लाडक्या बहिणीचा उबाळा हा निवडणुकीपूरता असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. तर दुसरीकडं लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढाकार घेतलाय.
अशक्य ते शक्य करतील दादा...
'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतात. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे. ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन, असं ट्विट अजित पवारांनी (Ajit Pawar) केलंय...
अर्थमंत्री अजित पवार यांनीच यंदाचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. योजनेच्या श्रेयावरून महायुतीतच चढाओढ सुरू झालीय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव असलं तरी राष्ट्रवादीच्या बॅनरवरून मुख्यमंत्री हा शब्द गायब आहे. या योजनेमुळं महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणाराय. राज्याची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता ही योजना खरंच यशस्वी होईल का, याबाबत शंका घेतली जाते. मात्र आता अजितदादांनीच अशक्य ते शक्य करण्याची जबाबदारी स्वीकारलीय.
संजय शिरसाट यांचा सल्ला
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पावर गटाला सुनावलंय...अजित पवारांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा उल्लेख न करता माझी लाडकी बहीण असा उल्लेख होता...त्यावरून शिरसाटांनी अजित पवार गटाला चांगलचं सुनावलंय...काही कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसावा असं ते म्हणालेत...तर, युतीत बारीक सारीक गोष्टी करून मतभेत होतील असं वागू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय..