`खोटं कशाला बोलायचं`; अजित पवार गटात जाण्यावरुन बाबा सिद्दीकींचा मोठा खुलासा
काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर 2024 मध्ये काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का असणार आहे.
Maharashtra Congress : माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता राज्याच्या राजकारणात व्यक्त केली जातीय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी आणि आमदार झिशान सिद्दीकी पुढील आठवड्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील होऊ शकतात अशी चर्चा सुरु होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, याबाबत झिशान सिद्दीकी यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगितलं आहे. दुसरीकडे आता बाबा सिद्दीकी यांनीही आपली माहिती भूमिका स्पष्ट केलं आहे.
मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्याने बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. गुरुवारी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा आमदार मुलगा झिशान यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन आमच्या पुढील रणनीतीवर चर्चा केल्याचे म्हटलं जात होते. यावर आता सिद्दीकी पितापुत्रांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या वडिलांबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, मी केवळ स्वतःबद्दल बोलू शकतो. काँग्रेस सोडून कुठल्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. वडिलांबाबत मात्र मी काही बोलू शकत नाही. मी कुठल्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीबाबतचं वृत्त खरं आहे. आमचं कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे आम्ही अधून-मधून भेटत असतो. परंतु, ती काही राजकीय बैठक नव्हती. मी इतर कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं.
बाबा सिद्दीकी काय म्हणाले?
"जर काही असेल तर सांगू. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. अजित पवार अशी व्यक्ती आहे जी सकाळी साडेसहा वाजताच सुरु होते. हे आम्हीसुद्धा नाही करत खोटं कशाला बोलायचं. मी मंत्री असताना पाहिलं आहे की, त्याच्यापेक्षा ज्यूनिअर असलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयात यायला त्यांना काहीही वाटायचं नाही. त्यांच्या आमदाराचे काम करण्यासाठी ते करायचे. कधी कधी वाईट वाटायचं की ही व्यक्ती आपल्या सोबत नाही. ती काम करणारी व्यक्ती आहे हे सर्वांनाच माहिती आहे," असे बाबा सिद्दीकी म्हणाले.
"स्पष्टीकरण द्यायला मी कोणाला बांधील नाही. पण मी हे नक्की सांगेन की मी आता काँग्रेसमध्ये आहे. पण भविष्यात कोणाबद्दलही सांगता येणार आहे. मला वाटत आहे की काँग्रेसमध्येच राहील," असेही बाबा सिद्दीकी म्हणाले.
"संजय राऊत हे वरिष्ठ नेते आहेत. ते पत्रकारांसमोर बोलत असतात. मला नाही वाटत की बोलावं. जेव्हा होईल तेव्हा उत्तर दिलं जाईल. मला वाटत नाही की उत्तर द्यावं. जेव्हा वाटेल तेव्हा राष्ट्रवादीत जाईल आणि तुम्हाला सांगेल. नसेल जाणार तर नाही सांगणार," असं बाबा सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं.