Shivsena UBT First Candidate List : महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील तेरा जागांचा यात समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर . पहिल्या यादीत मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ  वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱवण्यात आलं आहे. वरुण सरदेसाई हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात
मुंबईतला वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री (Matoshree) येतं. विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाकडे आहे आणि मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. मातोश्रीचं अंगण असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई विद्यापीठातली सिनेटची निवडणूक वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वातच जिंकली होती.


महायुतीत वांद्रे पूर्वची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पण अद्याप राष्ट्रवादीने या जागेवर आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे वरुण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी अशी चुरशीची लढत रंगणार आहे. 


कोण आहेत वरुण सरदेसाई? 
वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे ते पुत्र आहेत. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. वरुण सरदेसाई सध्या युवा सेनेचं काम पाहतात. नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हा राणेंच्या जुहूतल्या निवासस्थानी वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वातच निदर्शनं करण्यात आली होती. वरुण सरदेसाईंच्या युवासेनेनं लोकसभा निवडणुकीतही जोमानं प्रचार केला होता. आता विधानसभा निवडणुकीसाठी वरुण सरदेसाईंचा मतदारसंघ निश्चित झालाय.. 



वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून लढणार असल्याने त्यांचा सामना विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासोबत होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र सध्या झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीत आहेत. बाबा सिद्दीकी याच वांद्रे पूर्व मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 मध्येही विजयी झाले होते. 


बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सहानूभुतीच्या लाटेचा फायदा झिशान सिद्दीकींना मिळण्याची शक्यता आहे.. त्यामुळे वरुण सरदेसाईंसाठी ही निवडणूक तितकीशी सोप्पी नाही.  मातोश्रीच्या अंगणात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.