कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे
Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे लोकसभेची निवडणूक न लढवता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा देणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत एम आय जी क्लब वांद्रे येथे बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं असे विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
"यावेळी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे हे कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. त्याचं विश्लेषण मी सभेमध्ये केलं आहे. पहिल्या पाच वर्षातील गोष्टी ज्या मला पटल्या नाहीत त्याचा विरोध केला. 2014 च्या अगोदरची भूमिका ही
निवडूण आल्यानंतर तिकडे भूमिका बदलू शकते. तर मला भूमिका बदलणं आवश्यक होतं. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही तर त्याला धोरणांवरती टीका म्हणतात. त्यावेळी मी मुद्द्यावरुन टीका केली होती. त्यानंतच्या पाच वर्षात ज्या गोष्टी झाल्या त्याचं कौतुकही केलं. राम मंदिराचा विषय मोठा होता. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. पण १९९२ ते २०२४ पर्यंत रखडलेल्या गोष्टीबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असला तरी पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. हा विषय तसाच राहून गेला असता, असे राज ठाकरे म्हणाले.
"काही गोष्टी चांगल्या होताना दिसायला लागतात तेव्हा पुन्हा त्यांना संधी देणे आवश्यक आहे असं वाटलं. त्यामुळे मी आणि पक्षाने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदाची संधी देण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरवलं आहे. महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, गडकिल्ल्यांचे संवर्धन हे विषय आहेत. माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यं ही त्यांच्या अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे. पुढे कशाप्रकारे नरेंद्र मोदींची पावलं पडतायत हे पाहणं आवश्यक आहे. महायुतीमधल्या पक्षांच्या लोकांनी आणि उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संबंध साधायचा आहे आणि कोणाशी बोलायचं आहे याची यादी दोन दिवसांमध्ये तयार होऊन त्यांच्यापर्यंत जाईल. आमच्या पदाधिकाऱ्यांना योग्य मान देतील अशी माझी अपेक्षा आहे. पूर्णपणे सहकार्य आणि प्रचार करायला मी सगळ्यांना सांगितले आहे," असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे पक्षातीलच काही जणांनी राजीनामा दिल्याबाबत राज ठाकरेंकडे विचारले असता, मी पक्षाचा विचार करतो, ज्यांना समज-उमज नसेल, तर त्यांनी वेगळा विचार करावा, असं उत्तर दिलं. तुमची फाईल उघडली म्हणून तुम्ही भाजपला पाठिंबा दिला का, असं विचारलं असता, मी आताच पदाधिकाऱ्यांना सांगितलं, की कावीळ झाली की जग पिवळं दिसतं, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. बारामतीत सभा घेणार का, या प्रश्नावर राज ठाकरेंनी भाष्य केलं नाही.