मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी `सुपर प्लॅन` तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राज्यातल्या राजकारणाची गणितचं बदलली.. मात्र गमावलेली सत्ता, घटक पक्षांमध्ये झालेली फूट, यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आता अधिक मजबुतीने एकत्र आलीय. एवढंच नाही तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) रोखण्यासाठी मविआने सुपर प्लॅनही तयार केलाय. मात्र युत्या आणि आघाड्यांमधला सर्वात कळीचा मुद्दा ठरतो तो जागावाटपाचा. त्यामुळेच महायुतीला रोखण्यासाठी मविआनं जागावाटपाचं नवं सूत्र तयार केलंय.
महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रीत लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (Vidhansabha Election) निवडणुका लढवणार आहेत. तिन्ही पक्षांमधले मतभेद उघड न करण्यावर एकमत झालंय. जागेचा हट्ट धरायचा नाही तर जो जिंकेल त्याची जागा या सूत्राने आता मविआ लढणार आहे...
एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत तर अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यामुळे राज्यात काँग्रेस वरचढ झाल्याचं चित्र दिसत होतं. मात्र संजय राऊतांनी जागावाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला.. तर इंडियात जेव्हा तिकीट वाटपाचा विषय येईल तेव्हा जो उमेदवार पास होईल त्यालाच तिकीट मिळेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मविआनं जागावाटपाचं सूत्रं ठरवलं असलं तरी प्रत्यक्षात 2019 मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या मात्र उद्धव ठाकरेंकडे नसलेल्या खासदारांच्या जागांचा तिढा सोडवण्याचं आव्हान आहे.
मविआतलं जागावाटप, नेत्यांची डोकेदुखी
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. तेव्हा समसमान 16-16-16 जागांचं वाटप करणार? की मोठा भाऊ-छोटा भाऊ म्हणत प्रत्येक पक्ष अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार? 2019 मध्ये बुहतांश जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळाला होता. त्या जागांचा तोडगा कसा काढणार? जागा वाटपाच्या निर्णयाला काँग्रेस हायकमांडची मंजुरी मिळणार का? की राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिक जागांची मागणी होणार? लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातल्या इच्छूक उमेदवारांची धाकधूक वाढलीय.. मात्र जागावाटपातले हे मुद्देच मविआच्या ज्येष्ठ नेत्यांची नक्कीच डोकेदुखी ठरवणारे आहेत.
सुप्रिया सुळेंना साथ द्या
बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना केल्यायत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती यासंदर्भात विधानसभा निहायसुद्धा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली