महायुतीची `बिनशर्त` परतफेड? मुंबईतल्या `या` दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?
Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.
ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्या पाठिंब्याची विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) परतफेड होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) रिंगणात असलेल्या माहीम आणि बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) लढत असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात महायुतीनं उमेदवार देऊ नये अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलीय. महायुतीचा उमेदवार मागे घेण्यासाठी शिंदे-फडणवीस आणि अजितदादांना विनंती करणार असल्याचं शेलारांनी सांगितलंय.
राज ठाकरेंना आपण कुटुंबातील सदस्य मानतो. अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा द्यावा या आशिष शेलारांच्या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय. माहीम आणि शिवडी हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. शिवडीत अजूनही शिवसेनेनं उमेदवार दिलेला नाही. माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा तर विद्यमान आमदार सदा सरवणकरांचं काय असा यक्षप्रश्न शिवसेनेला पडलाय.
सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेऊ नये अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. सदा सरवणकर यांनी माघार घेवून महायुतीचा पाठिंबा मनसेच्या अमित ठाकरेंना देण्याची चर्चा सुरू झाल्याने सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर सदा सरवणकरही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी उमेदवारी घोषित केली आहे, मला एबी फॉर्म दिला असून आशिर्वादही दिलेत. ज्या चर्चा सुरु आहेत त्या अफवा असून मी निवडणूक लढवणार आणि निवडून येणार असं सदा सरवणकर यांनी म्हटलं हे.
राज ठाकरेंनी अडीचशे जागा लढवण्याचा निर्धार केलाय. राज्यातील 78 ठिकाणी उमेदवारही जाहीर झालेत. महायुती दोन जागांच्या पाठिंब्याचा आवळा देऊन मनसेकडं इतर अनेक ठिकाणी पाठिंबा मागू शकते. त्यामुळं या प्रस्तावावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औसुक्याचं असणार आहे.