नेहमीप्रमाणे पत्र लिहीलं तरी... राज ठाकरे यांच्या आवाहनानंतरही संजय राऊत भूमिकेवर ठाम
Sanjay Raut : मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं मत राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून व्यक्त केलं आहे. राज ठाकरे यांच्या पत्राला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
Maharashtra Politics : चिंचवड आणि कसबा पेठ येथील आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीची (Kasba and Chinchwad bypolls) घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीनेही (MVA) ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना यासंदर्भात फोन केले आहेत. तर राज ठाकरे यांनी पत्र लिहीत ही निवडणूक व्हावी यासाठी आवाहन केले आहे.
मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं मत राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून व्यक्त केलं. या पत्रावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी निवडणुका व्हायला हव्यात असे म्हटले आहे. तर राज ठाकरे यांच्या पत्रालही राऊतांनी उत्तर दिलं आहे.
"मतदारसंघामध्ये ज्याप्रकारचे वातावरण ते सध्या सरकारसाठी अनुकूल नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीने दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यानंतर आता सरकारला वाटत आहे की, ही निवडणूक होऊ नये. निवडणूक झाली की वेगळा निकाल लागेल आणि ते सत्य आहे. दोन्ही मतदार संघात निकाल वेगळा लागू शकतो असं आम्हाला वाटत आहे. म्हणून या निवडणुका होतील," असे संजय राऊत म्हणाले.
"निवडणुका व्हायला हव्यात अशी लोकांची इच्छा आहे. आम्हाला आमच्या भूमिका मतदारांना स्पष्ट करायच्या आहेत. त्यामुळे मुख्यत्र्यांनी आवाहन केले असेल किंवा राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्र लिहीलं असलं, तरीही निवडणुका होतील. अंधेरी, पंढरपूर, नांदेड येथे निवडणूक झाली. तिथे निवडणूक न लढण्याचा अपवाद पाळला गेला नाही," असेही संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय?
"महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही," असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.