Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची  घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांचा रामीनामा नामंजुर करण्यात आला. तसेच राजीनामा मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. राजीनामा नाट्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला खुंटा आणखी बळकट झाला आहे.  एवढंच नव्हे तर देशपातळीवरील त्यांचं महत्त्व देखील वाढले आहे (Maharashtra Politics).
शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा हा मोठा राजकीय भूकंप ठरला. या भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई असली तरी त्याचे हादरे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही बसले. काश्मीरपासून पार कन्याकुमारीपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी देशपातळीवरील अनेक नेत्यांनी शरद पवारांची मनधरणी केली. 


नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, माकप नेते कॉ. सीताराम येचुरी, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार अशा अनेक नेत्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना फोन करून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.


वयाच्या 83 व्या वर्षी देखील देशाच्या राजकारणात शरद पवारांना मोठं महत्त्व आहे हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.  ममता बॅनर्जी, मायावती, लालूप्रसाद यादव राजकारणात सक्रीय असले तरी त्यांच्यापेक्षा शरद पवारांची पॉवर जास्त असल्याचं मानलं जातं आहे.  शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी करून दाखवला. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.  सत्ताधारी भाजपच्या विरोधात देश पातळीवर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार  आहे.  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम 10 महिने शिल्लक आहेत. सत्ताधारी भाजपविरोधात मजबूत आव्हान उभं करायचं असेल तर शरद पवारांनी रणमैदानात पाय रोवून उभं राहणं आवश्यक ठरणार आहे. विरोधकांची ही एकी मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात शरद पवारच गॉडफादर असणार आहेत.