मुंबई : 2014 मध्ये फडणवीस सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनीच पुढाकार घेतला होता, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केलाय. तर अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर करण्याचा सूचक इशारा आशिष शेलारांनी दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गौप्यस्फोटांची मालिका कशी सुरू झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'2014मध्ये शिवसेनेचा काँग्रेससमोर सत्तास्थापनचा प्रस्ताव'


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता, असा बॉम्ब चव्हाणांनी टाकलाय. एवढंच नव्हे तर त्यावेळी काँग्रेसला भेटायला आलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते असा गौप्यस्फोटही चव्हाणांनी केलाय. यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांनीही चव्हाणांचा हा दावा खरा असल्याचं मान्य केलंय.


यामुळं मात्र मुख्यमंत्री शिंदेंची मोठी कोंडी झालीय. त्यामुळेच की काय शिंदे गटाच्या बचावासाठी भाजप नेत्यांनी पुढाकार घेतलाय. अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर त्यांची अडचण होईल असा सूचक इशारा आशिष शेलारांनी दिलाय.


अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. भाजप नेत्यांकडे त्याबाबतचीच एखादी क्लिप असावी, असा अंदाज आहे.. दरम्यान, अशोक चव्हाण नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार शिंदे गटानं केलाय.


राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं.. २०१४ साली काय घडलं, याचा गौप्यस्फोट करण्यासाठी अशोक चव्हाणांनी आताचीच वेळ का निवडली, असा प्रश्न उपस्थित होतोय... स्वतःवरचं किटाळ दूर करण्याचा चव्हाणांचा हा खटाटोप आहे की, शिवसेनेच्या अडचणीच्या काळात काँग्रेस बचावासाठी धावून आलीय, हे कोडं लवकरच उलगडणार...कारण राजकारणात काहीही लपून राहत नाही.