Maharashtra Politics : तब्बल महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadanvis Government) मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून पुन्हा एकदा रुसवे फुगवे सुरू झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रीपदाची लॉटरी लागूनही दीपक केसरकर (Deepak Kesarkar), दादा भुसे (Dada Bhuse) आणि संदिपान भुमरे (Sandipanrao Bhumre) हे शिंदे गटाचे तीन मंत्री खातेवाटपावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


दीपक केसरकरांना शिक्षणमंत्रीपद मिळूनही ते नाराज झालेत. त्यांना उद्योग खातं हवं होतं. दादा भुसेंना बंदरे आणि खणिकर्म खाते देण्यात आलंय. त्यांना पुन्हा एकदा कृषि खातं हवं होतं. तर संदिपान भुमरेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन हे जुनंच खातं मिळाल्यानं ते देखील नाराज असल्याचं समजतंय.


आश्चर्याची बाब म्हणजे कमी महत्त्वाचं खातं मिळाल्याचं खापर दीपक केसरकरांनी चक्क आधीच्या ठाकरे सरकारवर फोडलंय. आधीच शिवसेनेनं चांगली खाती पदरात पाडून घ्यायला हवी होती, असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, मंत्र्यांची नाराजी दूर करण्यास शिंदे-फडणवीस समर्थ असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. 


आधीच मंत्रिपद न मिळाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातले अनेक आमदार नाराज आहेत. संजय शिरसाट यांच्यासारख्या काही आमदारांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्या नाराजीला मोकळी वाटही करून दिली. त्यांना बाबापुता करून शांत केलं नाही तोच आता नाराज मंत्र्यांमुळं शिंदे गटाची डोकेदुखी आणखी वाढलीय. 


सहकाऱ्यांची ही नाराजी दूर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चांगलीच कसोटी लागणार आहे.