पुण्याहून अरुण मेहेत्रेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात व्हायचा तो घोळ झालाच आहे. आधी 85+85+85 या फॉर्म्युल्यावर एकमत झालं, आता 90+90+90 नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. म्हणजे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार आहे. असं असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जाहीर केलेल्या काही जागांमुळं वाद झालाय. शिवाय काही जागांवर मित्रपक्षातील सगळ्यांनीच दावेदारी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 12 जागांवरुन मविआत वाद
शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्ष शेकापने दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर करून कुरघोडी केली आहे. रामटेक, अकोला पूर्व, वणी, निफाड, गेवराई, लोहा, भूम परांडा, सोलापूर दक्षिण, पाटण,  ऐरोली आणि नाशिक मध्य असे वादाचे 12 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले. 


धाराशिवच्या भूम परांडा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रणजीत पाटलांना उमेदवारी दिलीय. तिथं राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचा दावा आहे. राहुल मोटेंनी तिथून उमेदवारी अर्जही दाखल केलाय. भूम परांड्याशिवाय नगरच्या श्रीगोंदा आणि साताऱ्यातल्या पाटण मतदारसंघाचाही वाद आहे. कधीकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघात शेकापचे बाबासाहेब देशमुख इच्छुक होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापला ही जागा देशमुख यांच्यासाठी हवी होती. शिवसेना ठाकरे यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून आयात केलेल्या दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करून टाकली.


लोहा मतदारसंघात सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे शेकापच्या तिकिटावर विजयी झाले होते. साहजिकच ते या निवडणुकीत शेकाप़कडून इच्छुक होते. त्यांच्या या इच्छेचा विचार न करता त्यांच्या जागी 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढलेल्या एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


जागावाटपावरुन वाद झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं थोडी नमती भूमिका घेतलीय. काही मतदारसंघ आणि काही उमेदवार बदलू शकतात असं संजय राऊतांनी सांगितलंय. मात्र ज्या मतदारसंघावर  दावा केलाय ते मतदारसंघ शिवसेनेचेच होते हे सांगायला राऊत विसरले नाहीत.


मविआतली जागावाटपाची संगीतखुर्ची नेत्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन संपुष्टात आणली पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि पाडापाडी होण्याची भीती आहे.