`माझ्या राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय`; BJP प्रवेशावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
Ashok Chavan : काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Ashok Chavan : लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकच चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेस नेते चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यासोबतच चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजप प्रवेशाआधी अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपण राजकीय आयुष्याला नव्याने सुरुवात करत आहोत असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं. "आज माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहे. अन्य जिल्ह्यातील लोकही प्रवेश करण्याची शक्यता आहे," असे अशोक चव्हाण म्हणाले.
दोन दिवसांत जाहीर करणार होते भूमिका
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांत आपली भूमिका जाहीर करु असे म्हटलं होतं. मात्र त्याआधीच अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवलं आहे. "काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय पूर्णत: वैयक्तिक आहे. कुठल्याही आमदाराशी मी याबाबत चर्चादेखील केलेली नाही. अन्य कोण काय निर्णय घेणार हे मला माहिती नाही. मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. पक्षाने मला खूप काही दिले आणि मी देखील मनापासून अनेक वर्षे पक्षाची सेवा केली आहे. येत्या दोन दिवसात राजकीय दिशा ठरवेन. मला काही अवधी लागेल. पण दोन दिवसात जाहीर करेन. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय घेतला नाही. पण दोन दिवसात माझी राजकीय भूमिका जाहिर केलीय," असे अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.
आगे आगे देखो होता है क्या - देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. "अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखो होता है क्या," असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.