मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह हातातून गेल्यानंतर आज ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांनी मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन केलं. शिवसैनिकांना मातोश्रीवर जमा होण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिवसैनिकांनी (Shivsainik) मातोश्रीबाहेर गर्दी केली. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय आल्यानंतर मातोश्रीवर आमदार, खासदारांची आज बैठकही बोलावण्यात आलीय. त्याचवेळी शिवसैनिक मातोश्री निवासस्थानाबाहेर जमा झाले.  यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यात करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज महाशिवरात्र आहे, महाशिवरात्रच्या आदल्या दिवशी शिवधनुष्य चोरीला गेलेलं आहे, सगळ्यांनी आता गल्लीबोळ्यात प्रचार करायचा आहे असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. धनुष्यबाण चोरणाऱ्या चोराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, आज त्या चोराला आव्हान देतोय, निवडणुक घ्या, निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं. ही नामर्दाची अवलाद असल्याचंही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवणारे, दिल्लीचे तळवे चाटणारे शिवसैनिक असू शकत नाहीत. दोन महिन्यात निवडणूक लागू शकते , तयारी लागा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.


सुप्रीम कोर्टात आव्हान देणार
धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता मोठं पाऊल उचललंय. केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत. शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्हावर दावा केला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाकडून  सोमवारी याचिका दाखल करण्यात येणार आहे.


मशाल चिन्हाचीही मुदत संपणार
ठाकरे गटाला मिळालेलं मशाल हे निवडणूक चिन्हं पोटनिवडणुकीपर्यंत वैध आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच हे चिन्हं आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्हं वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढलीय. ठाकरे गटाला हा नवा धक्का मानला जातोय.  नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह घेण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावं लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्हं देण्यात आलं. मात्र आता या महिन्यातच ही मुदत संपतेय. 


मशाल चिन्हही जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता ठाकरेंकडील मशाल चिन्हही जाण्याची शक्यता आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केलाय. केंद्रीय निवडणूक आयोगात समता पार्टी धाव घेणार आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार आहे..