Maharashtra Politics : शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Retirement) दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. पवारांच्या राजीनाम्यानं केवळ राष्ट्रवादीलाच (NCP) नव्हे तर मविआतल्या (Mahavikas Aghadi) घटकपक्षांनाही मोठा धक्का बसलाय. एकीकडे राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती आहे तर दुसरीकडे मविआनं सुरू केलेला वज्रमूठ सभांचा धडाका अचानकपणे खंडित होण्याची शक्यता आहे. पुढील सर्व वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha) रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे याबाबत विरोधकांनी आधीच सुतोवाच केलं होतं. यानिमित्तानं त्यांनी मविआच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटची वज्रमूठ सभा?
मुंबईत 1 रोजी झालेली महाविकास आघाडीची सभा ही शेवटची होती. यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार नाही, अस वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. मुंबईतल्या सभेत नागरिकांना आणि स्टेजवर असलेल्या लोकांना बोर झालं होतं अशी टीकाही शिरसाठ यांनी केली होती. तर संजय राऊत यांच्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत महाविकास आघाडी राहणार नाही अशी टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. 


कुठे होत्या वज्रमूठ सभा?
मविआची पहिली सभा 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये झाली तर 16 एप्रिलला दुसरी सभा नागपुरात पार पडली. तिसरी सभा 1 मे रोजी मुंबईत झाली. आता 14 मे रोजी पुण्यात 28 मे रोजी कोल्हापुरात, 3 जून रोजी नाशिक आणि 11 जून रोजी अमरावतीत पुढील सभा होणार होत्या. विशेष म्हणजे संभाजीनगर आणि मुंबईच्या सभेची जबाबदारी ठाकरे गटावर (Thackeray Group) होती तर विदर्भातल्या सभेचा भार काँग्रेसच्या खांद्यावर होता. मात्र राष्ट्रवादीच्या सभेवेळीच पक्षात गोंधळ झाल्यानं या सभांवर गंडांतर आलंय. 


मविआ नेत्यांकडून सारवासारव
मविआला मात्र विरोधकांचा आरोप मान्य नाही. मात्र सारवासारव करण्यासाठी मविआ नेत्यांनी दिलेल्या कारणांमध्येही एकवाक्यता नाही....कुणी उन्हामुळे तर कुणी पावसामुळे सभेचं वेळापत्रक बदलल्याचा दावा केलाय. उन्हाळ्यात सभा घेणं थोडसं अवघड होणार आहे, त्यामुळे तारखा बदलण्याचा निर्णय अनौपचारीक चर्चेत 1 तारखेलाच सभेनंतर झाला असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर पावसाळा सुरु झालाय त्यामुळे बैठक घेऊन सभा होईल की नाही हे ठरवलं जाईल असं नाना पटोले यांनी सांगितलं.


शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीतली अंतर्गत बाब असली तरी पवारच मविआचे शिल्पकार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम मविआवर झालाय हे कुणीही नाकारू शकत नाही.