Maharashtra Politics : राष्ट्रवादीत (NCP) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलाय. कारण अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वात बंडाचं निशाण फडकवणाऱ्या मंत्र्यांनी रविवारी अचानक शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. हे कमी झालं म्हणून की काय, दुसऱ्या दिवशी बंडखोर आमदारांना सोबत घेऊन अजित पवार पुन्हा एकदा सिनिअर पवारांच्या भेटीला गेले. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये तब्बल 45 मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली. झाल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त करतानाच, राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी आशीर्वाद द्या, अशी विनंती अजित पवार गटानं केल्याचं समजतंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचं सर्वांचं दैवत, नेते आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ मागितली नव्हती. शरद पवार बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरला आल्याची माहिती मिळाली होती. म्हणून आम्ही इथे आलो अशी माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी दिली. आता भेटीगाठींचा हा सिलसिला म्हणजे शरद पवारांची मनधरणी आहे की, अजित पवारांची रणनीती? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.


मनधरणी की रणनीती? 
रविवारी केवळ मंत्र्यांना सोबत नेल्यानं अजित पवार समर्थक आमदारांमध्ये (NCP MLA) नाराजीचं वातावरण होतं. विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांनी नाराजीचा सूर लावला. आम्हाला विश्वासात न घेता फक्त मंत्र्यांनाच घेऊन भेट का घेतली? असा सवाल आमदारांनी केला.मंत्र्यांना सहानुभूती मिळेल, मात्र आमदारांना मतदारसंघात रोषाला सामोरे जावं लागतं, अशी व्यथा आमदारांनी मांडली. त्यामुळंच अजित पवार आणि प्रफुल पटेल सर्व आमदारांना घेऊन सोमवारी पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला पोहचले.


या सगळ्या घडामोडींवर शरद पवारांनी सूचक मौन बाळगलंय.  आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. यापुढंही पुरोगामी भूमिका घेऊनच पुढं जायचं आहे, असं मत पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतलाय, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं होतं. मात्र पवारांनी अधिकृतपणे कोणतीही भूमिका मांडली नसल्यानं राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.


राष्ट्रवादी... प्रचंड आशावादी... अशी पक्षाची कॅचलाईन... त्यामुळंच शरद पवारांची मनधरणी करता येईल आणि बंडाला त्यांचे आशीर्वाद मिळतील, अशी आशा अजित पवार गटाला आहे. त्यांची ही आशा पूर्ण होईल का? आणि राष्ट्रवादी... प्रचंड आशीर्वादवादी होईल का, याकडं आता सगळ्यांचंच लक्ष असणाराय..