Maratha Reservation : मुंबईत येऊन आंदोलन करण्याची आक्रमक भाषा करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज मात्र काहीसे नरमले आहेत. त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय. उद्यापासून अंतरवालील साखळी उपोषण केलं जाणारंय. उपचारासाठी डॉक्टरांना सहकार्य करणार असून कार्यकर्त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय. मात्र सग्या सोयऱ्यांसाठी आपलं आंदोलन सुरूच राहिल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.  मराठ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी. अंबडमध्ये संचारबंदी लावल्याने कायद्याचं पालन करून शांततेत आंदोलन करा असं आवाहन जरांगेंनी केलंय. यावेळी जरांगेंनी मराठा आंदोलकांना घरी परतण्याच्या सूचना दिल्या. शिंदे, फडणवीसांनी (Shinde-Fadanvis) आता शहाणं व्हावं. आजच्या आजच सगेसोयरेंबाबत अंमलबजावणी करावी, नाहीतर नाराजीची लाट उसळेल असा इशारा जरांगेंनी दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मनोज जरांगेंच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोन सहकाऱ्याची नावं आहेत. जरांगेंसोबत मुंबईला सागर बंगल्यावर येण्यासाठी तयारी करत असताना पहाटे 4 वाजता दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. तीर्थपुरी गावातून शैलेंद्र पवार यांना तर अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...जरांगेंचे सहकारी म्हणून ते सातत्याने सोबत होते...रात्रीही भांबेरी गावात जरांगेंसोबत हे दोघेही सहकारी होते.. मात्र मुंबईला जाण्यासाठी रात्री हे दोघं घरी गेले असताना त्यांना पहाटे चार वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलंय.


भाजपची महत्त्वाची बैठक
जरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या, असे आदेश भाजपच्या (BJP) बैठकीत देण्यात आलेत. मात्र प्रत्युत्तर देताना संयम बाळगावा, सामाजिक तेढ वाढेल अशी वक्तव्यं नको, अशा सूचना देण्यात आल्यायत. जरांगेंनी काल फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर या सूचना करण्यात आल्यायत. भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीसांकडून मतदारसंघाचा आढावाही घेण्यात आला.


भाजप आमदार नाराज
दरम्यान, या बैठकीनंतर भाजप आमदारांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी या अहंकारातुन बाहेर यावं, मिडियात पब्लिसिटि मिळतेय. समाज आपल्या मागे आहे अस त्यांना वाटतंय, जरांगे यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार आहे असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. भविष्यात सर्व बाहेर येईल. इट का जवाब पत्थर से भाजप देणार असा इशारा यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. रोहित पवार, राजेश टोपे, शरद पवार (Sharad Pawar) हे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर देखील आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपने केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरक्षण देऊ शकले नाही. पण शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या भावना समजुन 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. जरागे म्हणजे मराठा समाज नाही. भाजपच नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि त्यांच्यावर टीका करत असाल तर खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही भाजपने दिलाय.


आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण प्रसिध्दीची नशा काहींना चढली आहे त्यातून हे फ्रस्टेशन आहे. विषय संपल्यावर परत का तो विषय काढला. जरांगे हा मविआचा एक प्याद आहे असा घणाघात भाजप नेत्यांनी केलाय.