सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन एक महिना झला. मात्र अजुनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. या महिनाभरामध्ये शिंदेंना पत्रकार परिषदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे मंत्री मंडळाचा विस्तार केव्हा होणार?, यावरून विरोधी नेत्यांनीही शिंदे आणि फडणवीसांवर टीका केली. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या मुहूर्ताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या रविवारपर्यंत म्हणजेच 7 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी चालू असून ती सुनावणी उद्या म्हणजेच गुरूवारी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा आणखी पुढे ढकलला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र आता केसरकरांच्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांणा पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.


राज्यपाल आज नागपूरमध्ये
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज संध्याकाळी नागपूर दौऱ्यावर जात आहेत. नागपूरात शैक्षणिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात राज्याल कोश्यारी सहभागी होणार आहेच. उद्या म्हणजे 4 ऑगस्टला सकाळी कार्यक्रम होणार आहे. दुपारनंतर कोशारी परत मुंबईत येतील. 


5 ऑगस्टला राज्यपाल मुंबईत असून त्याच दिवशी शपथविधी होण्याची शक्यता आहे कारण 6 ऑगस्टला पुन्हा राज्यपाल कोश्यारी दिल्लीत जात आहे. दिल्लीत 6 ऑगस्टला आझादी का अमृतमहोत्सव समिती बैठकीला राज्यपाल पीएम नरेंद्र मोदी यांच्या समवेत उपस्थित राहणार आहेत. 


शिंदे सरकारचे 16 ते 20 मंत्री शपथ धेणार ? 
शिंदे सरकारच्या शपथविधीत काही जुने तर काही नवीन चेहरे दिले जातील. प्रादेशिक विभाग निहाय जागा लक्षात घेत मंत्री वाटप केले जाईल. 
यात उदय सामंत, दादा भुसे, तानाजी सावंत, शभुराजे देसाई, दीपक केसरकर, बच्चू कडू  यांची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा आहे.


मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग
भाजप आणि शिंदे गटात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. शिंदे गटासह भाजप नेत्यांनीही गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेत असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता त्यावर, विस्ताराची तारीखला ठरली की सर्वात आधी मी तुम्हाला सांगेल, असं म्हणत उत्तर देणं टाळलं होतं.


दरम्यान, शिंदे सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले यावर बोलताना विरोधी पक्षातील नेत्यांनी खोचक अशी टीका केली होती.  शिंदे आणि फडणवीसांचं हे जम्बो मंत्रिमंडळ असल्याचं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला होता. विस्तार न झाल्याने सध्या शिंदे सरकार टीकेचं धनी ठरत आहे. त्यामुळे केसरकरांनी सांगितलेल्या मुहूर्तादिवशी तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.