Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी अजब विधान केलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत (Mahayuti) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यात जमलं नाही. आज जरी मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर येऊन उलट्या होतात' असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीया वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धाराशिवमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना तानजी सावंत यांनी आपण हाडाचा शिवसैनिक असून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं कधीच जमलं नसल्याचं म्हटलं आहे. आज मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, सहन होत नाही' असं व्यक्तव्य केलं. 


राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रत्यु्त्तर
शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने (NCP) त्यांना उत्तर दिलं आहे. तानाजी सावंत हे महायुतीतलं वेगळ्याच पद्धतीचं पात्र आहे, ज्या व्यक्तीचे पुतणे दुसऱ्या पक्षात जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील, ज्यांच्याबाबत घरातच संभ्रम असेल ती लोकं अशा पद्धतीने मीठाचा खडा टाकतात असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 


त्यांना मांडीला मांडी लावून जर मळमळ होत असले, तर आमच्या मांडीला मांडी लावून एसटीत बसता कशाला उतरणा खाली, आरोग्य मंत्र्यांना जर मळमळ होत असेल, तर त्यांचा योग्य इलाज मुख्यमंत्र्यांनी करावा असा सल्लाही मिटकरी यांनी दिलाय.


राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा धर्म पाळतोय, परवा निलेश राणे काहीतरी बोलले, सदाभाऊ खोत काहीतरी बोलले आता तानाजी सावंत यांचं हे वक्तव्य म्हणजे महायुती टिकवायची ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अशापद्धतीने कोणी मिठाचा खडा टाकतायत त्यांनी जाब विचारायचा नाही का? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. 


तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, आम्ही महायुतीचा धर्म म्हणून शांत आहोत, याचा अर्थ आम्ही गप्प बसतो असा होत नाही, आम्ही तोडीसतोड उत्तर देऊ शकतो, पण मला माझ्या पक्षाने काही मर्यादा घालून ठेवल्या आहेत, त्यामुळे मी यावर बोलणार नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांचा इलाज तात्काळ करावा असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.