मुंबई : राज्य सरकारने पगारवाढीचा पर्याय दिल्यानंतर एसटी कामगार संपावर ठाम आहेत. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 18 दिवसांपासून संप सुरु आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. इंटक आणि कामगार सेना संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीत काय चर्चा झाली
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. बरेचसे कामगार कामावर रुजू झाले आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियची कृती समितीशी चर्चा करुन याबाबतीत कामगारांचं म्हणणं, किंवा कामगारांची मानसिकता जी गेल्या काही दिवसात बघितली होती, त्यावर आणि एसटीची सेवा सुरुळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, याबाबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक झाली.


कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही
एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याने त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना सांगितलं संप जेव्हा संपेल तेव्हा यावर चर्चा करु, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. एवढी वाढ दिल्यानंतरही संपाच्या बाबतीत जो काही संभ्रम आहे. त्याबद्दलही चर्चा झाली. 


बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही
काही जाचक अटी असेल त्यावर विचार केला जाईल, पण त्याचबरोबर कुठलीही बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही, याची देखेली जाणीव आम्ही त्यांना करुन दिली असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 


सातव्या वेतन आयोगावर चर्चा
पगारवाढ देताना राज्य सरकारने जी हमी घेतली आहे, सर्वांच्या मदतीने एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा राज्य सरकारने दिला आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागणी आल्या आहेत की आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा आणि आमचा करार दहा वर्षांचा करा, आम्ही त्यावरही विचार करु शकतो, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.


संप मिटल्यानंतर चर्चा करु
राज्य सरकार चार पावलं पुढे आलं आहे, अशावेळी जो मुद्दा सरकारच्या हातात नसून हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या हातात आहे, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच पुढचा विचार करता येईल. एसटी बंद ठेवणं कर्मचारी आणि राज्य सरकारला पडवणारा नाही, प्रवाशांची गैरसोय होतेय, संप मागे घेऊन जेव्हा कामगार कामावर येईल तेव्हा या गोष्टींवर चर्चा करायची तयारी असल्याचं अनिल परब यांनी बैठकीत सांगितलं.


कामगारांना इशारा
पण आर्थिक भार स्विकारत रहायचं आणि त्याबदल्यात एसटी बंद ठेवायची असं देखील होणार नाही. पैसे देऊन संप सुरु राहणार असेल तर पैसे न देऊन संप सुरु राहिला तर काय वाईट आहे. असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.


एकदोन दिवसात बऱ्यापैकी बसेस सुरु होतील
आज अनेक कामगार कामावर रुजू झाले होते. त्यामुळे एक दोन दिवसात बऱ्यापैकी गाड्या सुरु होतील असा आम्हाला विश्वास आहे, आज रात्री आम्ही निर्णय घेऊ जे कामगार उद्या कामावर यायला तयार असतील त्यांना आम्ही परवानगी देऊ, पण जर कामगार कामावर आले नाहीत प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय.