`सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही` गोपीचंद पडळकर यांचा इशारा
`भाजपचे 105 आमदार तुमच्यासोबत इथे बसायला येतील` एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप नेते मैदानात
मुंबई ST employees strike : राज्यभरात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चिघळलाय. एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आता भाजप नेतेही मैदानात उतरले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंत पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार होता, पण त्यापूर्वीच पोलिसांनी सोमय्या आणि पडळकरांना ताब्यात घेतलं.
किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर आमदार निवसातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवलं, त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. मंत्रालयात आंदोलनाची परवानगी नसल्यानं आझाद मैदानात आंदोलन करावं अशी सूचना पोलिसांनी त्यांना केली. यानंतर पोलीस किरीट सोमय्या आणि पडळकर यांना आझाद मैदानाकडे घेऊन गेले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारवर जोरदार आगपाखड केली. राजकीय पोळी भाजण्याचं कारणच नाही.
हे आंदोलन एसटीचं आहे आम्ही त्यांना साथ देत आहोत, असं प्रवीण दरेकरांनी म्हंटलंय. तर सरकारने आता हर्बल गांजा ओढला आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
एक अनिल बाहेर आणि दुसरा आत - सोमय्या
आझाद मैदानात केलेल्या भाषणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरदारा निशाणा साधला. सगळीकडे पोलिसांची नाकाबंदी असतानाही इतके लोक आले, असं तर मंत्रालयाचा ताबा घेता आला असता, मंत्रालयात कोणी उपस्थित नाही आणि इथे येण्याची त्यांची हिम्मत नाही, अशी टीका सोमय्या यांनी केली. परब साहेब काय करत होतात ट्रान्सफर ऑर्डवर सह्या करत होतात की हिशोब मोजत होतात, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.
एक अनिल बाहेर आणि दुसरा आत त्यामुळे आतल्या अनिलचं वसूलीचं काम या अनिलला करावं लागत आहे, असा चिमटा सोमय्या यांनी काढला आहे. कोव्हिड औषध व्यवहारांमध्ये केलेल्या घोटाळ्यांमधले थोडे पैसे एसटीसाठी वळवा, आतापर्यंत 50 हजार कोटींचे घोटाळा यांनी केलेत असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी केला आहे.
आता इथेच संसार थाटू - पडळकर
राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. कर्मचाऱ्याचा आक्रोश मूक बहिर आंधळं असणाऱ्या सरकारसमोर मांडण्यात येतोय, 35 कर्मचाऱ्यांची आत्महत्या, ही महाराष्ट्र सरकारला शोभणारी गोष्ट नाही, कर्मचाऱ्यांना भेटण्याऐवजी त्यांना तुम्ही निलंबनाची नोटीस देताय अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
तसंच जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे. दिवाळी गोड केली अशी बातमी आली, पण दिवाळी नंतर 4 आत्महत्या का झाल्या याचं सरकारने उत्तर द्यावं असं पडळकर यांनी म्हटलंय. तसंच रोज 65 लाख रुपये मातोश्री वर जातात असा आरोप गोपीचंद पडलकर यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांना द्यायची वेळ आली की महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जातं, आता इथेच संसार थाटू कुटुंबाला इथेच बोलवून घ्या निर्णय झाल्याशिवाय आपण इथून उठायचं नाही, असा निर्वाणीचा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.
काय बापाचं राज्य आहे का?- दरेकर
एका बाजूला सांगतात चर्चेचे दरवाजे खुले आणि दुसऱ्या बाजूला अवमान याचिका दाखल करायची, असं सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर यांना काय बापाचं राज्य आहे का? असं ठणकावलं आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही अनिल परब यांच्याकडे गेलो, कारवाई करणार नाही असा शब्द त्यांनी दिला, पण मी गेल्यानंतर संप मागे घ्यायला सांगा असं त्यांनी मीडियाला सांगितलं असे खोटारडे लोक आहेत असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
पैसे कुठून आणणार असं सांगतात, बर झालं किरीट सोमय्या आले आहेत ते सीए आहेत ते मार्ग सांगतील, तुम्ही विलीनीकरणचा निर्णय घ्या पैसे कसे उभे करायचे आम्ही सांगतो, बाकी राज्याचे महामंडळ बघा किती भार उचलतात असं दरेकर यांनी म्हटलं आहे. चर्चा नको आश्वासन द्यायला मैदानात या, आमची फौज आता एक एक कशी इथे येते ते बघा, भाजपचे 105 आमदार तुमच्यासोबत इथे बसायला येतील, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे