मुंबई : पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. कारण महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडवणूक जाहीर करण्यात आल्याने आजपासून आचारसंहिता लागू झालेय. त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करता यावी म्हणून भाजपकडून सेनेला झुकते माफ मिळण्याची शक्यता होती. सेनेला मंत्रीपद मिळण्याची कुजबूज सुरु होती. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का, याचीही उत्सुकता होती. मात्र, विस्तार रखडल्याने सगळी चर्चाच ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केलेय. त्याचाच एक भाग म्हणून कितीही काहीही झाले तरी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात येत आहे. भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी आटोकात प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून 'मातोश्री'वर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. मात्र, बंद दाराआड झालेली दोन तास चर्चा बरेच काही सांगून जाते. मात्र, काय चर्चा झाली ते पुढे आलेच नाही. भाजपकडून मित्र पक्षांना खूश करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, त्याला आता खिळ बसलेय.


नाराज एकनाथ खडसे, शिवसंग्रमाचे विनायक मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चर्चा होती. तसेच ज्या मंत्र्यांचे काम चांगले नाही त्यांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी घाट घातला जात होता. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीमुळे हा विस्तार आता लांबणीवर पडलाय.


दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १६ जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे असे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, अमरसिंह पंडित, नरेंद्र पाटील असे चार आणि शिवसेनेचे अनिल परब, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर तर भाजपचे भाई गिरकर यांची मुदत संपत असल्याने ही निवडणूक जाहीर झाली आहे.