Graduate Election : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 30 जानेवारीला मतदान
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे
Graduate Election : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. नाशिक (Nashik) ,अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघासाठी (Teachers Legislative Council Election) निवडणूक होणार आहे. 30 जानेवारीला म्हणजे सोमवारी मतदान (Voting) होईल तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी (Counting) पार पडेल. उमेदवारांच्या प्रचारासाठी सगळ्याच पक्षांनी जोर लावला आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तर मविआकडून अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनीही जोरदार प्रचार केलाय. निवडणुकीदरम्यान दारूविक्रीवर घातलेली बंदी केवळ निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारीलाच असणार आहे. तर मतमोजणीच्या दिवशीही दारुविक्री सुरु राहणार आहे.
कोणत्या मतदारसंघात कोणाची लढत
कोकण शिक्षक मतदार संघ
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत 8 उमेदवार रिंगणात आहे. पण मुख्य लढत महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात आहे.
मराठवाडा शिक्षक मतदार संघ
मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून दोन बंडखोर असल्याने याचा फटका महाविकास आघाडीच्या विक्रम काळेंना बसण्याची शक्यता आहे
नागपूर शिक्षक मतदार संघ
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने समर्थन दिलेले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे उमेदवार नागो गाणार, महाविकास आघाडीने पाठींबा दिलेले विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत होतेय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सतीश इटकेलवारही रिंगणात आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघ
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मविआकडून धीरज लिंगाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी तिसऱ्यांदा पदवीधरांचं नेतृत्व करण्यासाठी कंबर कसली आहे. अमरावती विभागात दुहेरी लढत असली तरी बंडखोर मात्र डोकेदुखी वाढवणार असल्याचं दिसतंय.
नाशिक पदवीधर मतदार संघ
नाशिक पदवीधर मतदारसंघात सध्या 22 उमेदवार रिंगणामध्ये असले तरी अपक्ष सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात चुरस आहे.
नाशिकमध्ये भाजपचा पाठिंबा
नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे संकेत मिळतायत. आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही तर भुमिपुत्राच्या पाठीशी उभं राहणार असं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी केलंय.. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस आणि बावनकुळेंना सांगणार असंही विखे-पाटील म्हणालेत..