दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात शिक्षक भरतीसारखा महत्त्वाचा विषय आजही प्रलंबित आहे. लाखो तरुण तरुणी उच्च शिक्षित असूनही बेरोजगार आहेत. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी देऊन आता तब्बल वर्ष उलटले. अजूनही प्रत्यक्षात शिक्षक भरती झालेली नाही. यामुळे निराश झालेल्या तरुणांनी आता तंत्रज्ञानाला आणि सोशल मीडियाला हाताशी धरून आपलं आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांनी गेल्या वर्षी १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी दिली ते राज्यातल्या तब्बल १ लाख ७८ हजार तरुण आजही नोकरीच्या आशेवर आहेत. डी.एड आणि बी.एड शिक्षण पूर्ण करुन सरकारने शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी जाहीर केली. ही परीक्षाही उमेदवारांनी पार पाडली. मात्र, यालाही वर्ष उलटले तरी राज्यात शिक्षक भरती झालेली नाही.


 





एकाबाजूला राज्यातल्या जिल्हा परिषद, महापालिका, आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे हजारो तरुण शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीनुसार...


- पहिली ते नववीसाठी २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत


- नववी ते बारावीसाठी ११ हजार ५८९ जागा शिक्षकांसाठी रिक्त आहे


- तर यासाठी तब्बल १ लाख ७८ हजार डीएड बीएडधारकांनी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता चाचणी दिलीय.


शिक्षक भरतीसाठी तरुणांनी आता सोशल मीडियाचे माध्यम स्विकारले आहे. ट्विटरवर शिक्षक भरतीसाठी जोरदार चर्चा सुरु असून तरुणांनी शिक्षक भरतीसाठी ट्विटरवर मोर्चा सुरु केलाय.