धमक्या, शिवराळ भाषा अन् खुनी राजकारण! देवा राजकारण्यांच्या सूडबुद्धीला सुबुद्धी दे
सध्याच्या राजकारणाने आणि राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सुडबुद्धीचं राजकारण सुरु आहे
Maharashtra Politics : बाळासाहेब ठाकरे-शरद पवार, विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे- शरद पवार.. कलगीतुरा महाराष्ट्रानं पाहिले.. मात्र कधीही या नेत्यांनी एकमेकांबद्दल ना शिवराळ भाषा वापरली ना एकमेकांवर व्यक्तिगत टीका केली. उलट पराकोटीचं राजकीय वैर असतानाही या नेत्यांनी कौटुंबिक संबंध जपले. मात्र सध्याच्या राजकारणानी आणि राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणलीय. शिवराळ भाषा, कॅमेऱ्यासमोर धमक्या, खुनाचे आरोप हे राजकारणी एकमेकांवर करु लागलेत. फार दूरचं नको.. गेल्या दोन आठवड्यातल्या घटनांवर नजर टाकली तर लक्षात येईल की राज्याच्या राजकारणानं कोणता स्तर गाठलाय
महाराष्ट्राचं खुनी राजकारण
मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकताच केला
माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केला
जावई आणि मुलीच्या हत्येची सुपारी ठाणे मनपा सहायुक्त महेश आहेरांनी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला, एक ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी एका कुख्यात गुंडाला जिवे मारण्याची सुपारी दिल्याचं पत्र संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलं.
ही आताची 4 उदाहरणं बोलकी आहेत. याशिवाय दररोज होणारे कमरेखालचे आरोप, शिवराळ भाषा याची तर मोजदादही नाही.महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. पराकोटीचे राजकीय मतभेद असतानाही व्यक्तिगत-खासगी टीकाटीपणी करायची नाही उलट कौटुंबिक संबंध जोपासायचे असा अलिखित नियम आजवर पाळला गेलाय.
पण कुठेतरी या परंपरेला तडा गेलाय असं खेदानं म्हणावस वाटतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही देशात आदर्श मानली जाते. तिचा तोच पुरोगामी, शालीन आणि सुसंस्कृत चेहरा काळवंडत चाललाय का हा प्रश्न आहे..